Saturday, February 1, 2014

मुजफ्फरनगर : भय इथले का संपत नाही?

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर आणि शामली जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर २०१३ मध्ये उसळलेल्या दंगलीत अनेक गावांनी या दंगलीचा भीषण वणवा अनुभवला. लाख बावडी हे असंच एक खेडं. लाख बावडीबरोबरच लिसाड, फुगना, कुत्बा, किराना, बुधना आणि बाहवाडी या गावांनाही मोठी झळ पोचली.

लाख बावडी गावचा पस्तीस वर्षाचा आबिद खान सांगतो की ८ सप्टेंबरला सकाळी साडेसातच्या सुमारास काही तरूण घराबाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की जीव प्यारा असेल तर लगेच पळून जा. घरातले आम्ही सगळे बिल्लू प्रधानच्या घराकडे निघालो. बिल्लू प्रधान म्हणजे सुधीरकुमार, लाखबावडी गावचा निवडून आलेला प्रमुख. तो बिल्लू प्रधान या नावाने ओळखला जातो. तुम्हाला काही होणार नाही असं सांगून बिल्लू प्रधानने त्याच्या मोठ्या घरात काही जणांना आसरा दिला आणि काही जणांना वेगवेगळ्या बाजूंनी पळून जायला सांगण्यात आलं.

आबिदच्या कुटुंबियांप्रमाणेच इतरही काही जण तिथे आले होते. त्यात सुमारे ३० स्त्रिया होत्या. बिल्लू प्रधानने जो रस्ता दाखवला होता त्या रस्त्याने आबिद, त्याचे आजोबा आणि त्याच्याबरोबरचे सुमारे ५० जण निघाले. या रस्त्यातच एक जमाव त्यांची वाट बघत थांबला होता. आबिदचे आजोबा आणि काका त्याच्या डोळ्यासमोर मारले गेले. आबिद आणि त्याचे वडील जीव वाचवण्यासाठी ऊसाच्या शेतात लपले. आबिदने पोलिसांना फोन केला. पोलीस चार तासाने, सगळं संपल्यावर आले. तोपर्यंत गावातल्या ८० लोकांना मारण्यात आलं होतं. आबिदच्या आजोबांचा मृतदेह त्याच दिवशी मिळाला. त्याच्या आईचा जखमी, नग्नावस्थेतला मृतदेह दुसऱ्या दिवशी मिळाला. त्याच दिवशी आबिद आणि वाचलेले कुटुंबीय गाजियाबादमधील लोई येथील निर्वासित छावणीत जाण्यासाठी निघाले.
       
आबिदचा हा अनुभव आऊटलुक साप्ताहिकाच्या तीस डिसेंबरच्या अंकात प्रकाशित झाला आहे. नेहा दीक्षित यांनी लिहिलेल्या लेखात आबिदबरोबरच इतर अनेक अनुभव आहेत आणि ते सुन्न करणारे आहेत. निर्वासित छावण्यात राहणाऱ्या अनेक स्त्रियांना त्यांनी प्रयत्नपूर्वक बोलतं केलं आणि त्या स्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या सांगितल्या.

प्रत्येक कहाणीच्या तपशीलात जायची गरज असली तरी एका अर्थी तशी गरज नाहीदेखील कारण त्यात काय असणार आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. दंगल आणि दंगलीत स्त्रियांची विटंबना याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. इतिहास लाजिरवाणा असतो आणि तरीही त्याची पुनरावृत्ती होतेच. मग शतक कुठलंही असो. त्यादृष्टीने मध्ययुग आणि एकविसावं शतक यात काही फरक नाही!    

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिमांशूकुमार यांचे निर्वासित छावण्यांच्या भेटीदरम्यानचे अपडेट्सदेखील महत्त्वाचे आहेत. ते लिहितात, मुजफ्फरनगर-शामली भागातील जौला येथील निर्वासित छावणीत राहणाऱ्या लियाकतला एके दिवशी विशेष तपासणी पथकाच्या अधिकाऱ्यांनी मुजफ्फरनगरला यायचा आग्रह केला आणि ते म्हणाले की तू ज्यांच्या नावाने तक्रार दाखल केली आहेस ती नावे काढून टाक. त्यावेळेला बहुतेक जण नमाज पढायला गेले होते. लियाकतला जबरदस्तीने गाडीत बसवल्यावर उपस्थित स्त्रिया गाडीपुढे आडव्या पडल्या. थोड्या वेळात नमाज पढायला गेलेले लोक परत आले. पोलिसांना लियाकतला तिथेच सोडून द्यावं लागलं आणि ते परत गेले. लियाकतचा व्हीडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहे. कहर म्हणजे सरकारच निर्वासित लोकांना हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात आहे. २७ डिसेंबर २०१३ रोजी सरकारनेच काही झोपड्या तोडल्याचं वृत्त आहे.

५१००० मुस्लिम लोकांचे विस्थापन (अधिकृत सरकारी आकडा, खरा आकडा माहीत नाही), बलात्कार, खून, शामली आणि मुजफ्फरनगर भागातील हजारो लोक निर्वासित छावण्यात वस्तीला, त्यांच्या मनातील भीती, गाव सोडायला लागल्याचं दुःख, छावण्यातील अपुऱ्या सुविधा, १२ वर्षाखालील ३४ मुलांचा थंडीने गारठून मृत्यू आणि या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांचं वक्तव्य असं होतं की निर्वासित छावण्यात कुणी निर्वासित राहातच नाहीत, तिथे आहेत ते भाजप आणि काँग्रेसने पेरलेले राजकीय कार्यकर्ते आणि षड्यंत्रकारी लोक!

मुलायमसिंग यादव आजतागायत एकदाही निर्वासित छावणीला भेट द्यायला गेलेले नाहीत. समाजवादी पार्टीचा वार्षिक महोत्सव - सैफई महोत्सव - जो मुलायमसिंगांच्या सैफई या जन्मगावी दरवर्षी साजरा होतो त्यात यावर्षी कपिल शर्मा, कैलाश खेर, सलमान खान, शामक दावर वगैरेंनी हजेरी लावली. या महोत्सवाचं उद्घाटन वरिष्ठ पत्रकार वेदप्रकाश वैदिक यांच्या हस्ते झालं. यावेळी जया बच्चन उपस्थित होत्या. (महाराष्ट्रात अमिताभ बच्चनने राज ठाकरेंशी मांडवली केली त्यावरचा हा बहुधा उतारा असावा!). अखिलेश यादव आणि मुलायमसिंग यादव यांनी या 'सांस्कृतिक' महोत्सवाचा पहिल्या रांगेत बसून आनंद घेतला. ८ जानेवारी रोजी माधुरी दीक्षितचं नृत्य आणि सलमान खान, रणवीर सिंग, सोहा अली खान यांचा संयुक्त कार्यक्रम याने महोत्सवाची सांगता झाली. माधुरी दीक्षितच्या 'डेढ इश्किया' या आगामी चित्रपटावरील मनोरंजन कर राज्यात माफ करण्याची घोषणाही उत्तर प्रदेश सरकारने केली. हा चित्रपट करमुक्त करण्याचं कारण सांगताना एका प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितलं की या चित्रपटाचा काही भाग लखनौमध्ये चित्रित झाला आहे म्हणून तो करमुक्त करण्यात आला! मुजफ्फरनगरच्या जखमा ताज्या असताना, निर्वासित छावण्यात लोक हालात राहात असताना हा महोत्सव नीट सुरू झाला, तो १५ दिवस चालला, त्यावर वारेमाप खर्च केला गेला, माधुरी दीक्षितला आणण्यासाठी सरकारी विमान गेलं आणि दीक्षितबाई सैफईला पोचल्यावर सलमान खान, रणवीर सिंग आणि सोहा अली खानला आणण्यासाठे ते विमान पुन्हा मुंबईला पाठवण्यात आलं!    

मुजफ्फरनगर अनाकलनीय प्रकरण झालं आहे. मुस्लिमांची मसीहा म्हणवणारी समाजवादी पार्टी मुस्लिमांकडे संपूर्ण दुर्लक्ष करते आहे आणि दुसरीकडे भाजप अर्थातच धार्मिक विद्वेषाचा तवा गरम कसा राहील याची काळजी घेण्यात गुंतली आहे. २००२ साली गुजरातमध्ये राज्यसरकार पुरस्कृत हिंसा घडली. २०१३ मधलं मुजफ्फरनगरचं चित्रही वेगळं नाही. नियोजनबद्ध कत्तल! प्रत्येकच सरकार धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करतं. पण महत्त्वाचं असतं ते सरकार अधिकृत पत्रक, जाहीरनामे, घोषणा दर्शनी भागात, लोकांना दिसतील असं ठेवून जे दिसत नाही अशा कोपऱ्यात जे करतं ते!

मुजफ्फरनगर प्रकरण सुरू झालं ते २७ ऑगस्ट २०१२ ला. कवाल गावातल्या शाहनवाज नावाच्या एका मुस्लिम मुलाने एका जाट मुलीची छेड काढली आणि तिच्या दोन भावांनी (सचिन आणि गौरव) त्या मुलाचा खून केला. (एक माहिती अशी आहे की सात जाट युवकांनी मिळून हे कृत्य केलं. उरलेल्या पाच जणांना अजूनही अटक झालेली नाही.) याला प्रत्युत्तर म्हणून चिडलेल्या मुस्लिम समूहाने या दोन्ही भावांना मारलं.

आता गडबड अशी आहे की मुळात छेड काढली की नाही इथपासून गोंधळ आहे. प्रत्यक्षदर्शी लोक सांगतात की असं काही झालंच नव्हतं. वाद सुरू झाला तो सायकलींच्या टकरीवरून आणि त्यात मुलीची छेड काढल्याचा मुद्दा आणला गेला तो हिंदुत्ववादी अजेंड्याचा भाग म्हणून. अजून एक शक्यता अशी की त्या जाट मुलीचे आणि त्या मुस्लिम मुलाचे प्रेमसंबंध होते आणि जाट लोकांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे शाहनवाजला मारणं हा ऑनर किलिंगचा प्रकार असू शकेल. गावातल्या काही दलितांकडून ही माहिती मिळाली असं फ्रंटलाईन पाक्षिकाच्या सप्टेंबर १८, २०१३ च्या अंकातील अजॉय आशीर्वाद महाप्रशस्त यांच्या लेखात म्हटलं आहे. याच लेखात ते म्हणतात की सचिन आणि गौरवच्या अंत्यसंस्कारानंतर परत येताना जाट लोक कवालमधील मुस्लिम वस्तीत गेले आणि त्यांनी मुस्लिमांच्या घरांची आणि दुकानांची तोडफोड केली. मशीदीचंही नुकसान केलं. एक मुस्लिम रहिवासी सांगतो की त्यावेळी ते 'जाओ पाकिस्तान वर्ना कब्रस्तान', 'हिंदू एकता जिंदाबाद', एक के बदले एकसौ' अशा घोषणा देत होते'. हा रहिवासी पुढे म्हणतो की दोन जाट मुलांना मारलं हे चूकच आहे. त्यातील दोषी लोकांना अटक करा आणि शिक्षा कराच. पण आमचा काय दोष? आम्ही यात हकनाक अडकलो आहोत आणि भीतीत जगण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही.

नात्सी जर्मनीने काही काळ पी. जी. वुडहाऊस या प्रसिद्ध ब्रिटीश लेखकाला अटकेत ठेवलं होतं. जर्मनांकडून छळ होऊनही तुझ्या मनात त्यांच्याबाबत राग कसा नाही असं पत्रकारांनी विचारल्यावर वुडहाऊस म्हणाला, 'आय कॅननॉट हेट इन प्ल्यूरल्स' - मी घाऊक तिटकारा कधीच करत नाही! आणि धार्मिक-जातीय दंगलींमध्ये नेमकं हेच होतं. घाऊक तिटकारा! एका मुस्लिम मुलाने चूक केली (ती चूकदेखील धार्मिक संबंधातली नाहीच!) म्हणून सगळ्या मुस्लिमांवर हल्ला. दुसरीकडे एका मुस्लिम मुलाला मारल्याच्या गुन्ह्याबद्दल कायदा हातात घेऊन त्या हिंदू मुलांना मारून टाकणं हीदेखील चूकच. (हे बहुसंख्याकांच्या हातात कोलीत दिल्यासारखं होतं). गुन्हा आणि गुन्हेगार याकडे सरळ दृष्टीने, एक विशिष्ट केस म्हणून न बघता त्याला हमखास जातीय-धार्मिक रंग दिला जातो आणि मग निष्पापांचं मुजफ्फरनगर व्हायला अजिबात वेळ लागत नाही! सामान्य नागरिक भडक माथ्याचे आहेत आणि अगदी मूर्ख आहेत हे जरी क्षणभर मान्य केलं तरी प्रशासनाचं काय? प्रशासनाने जानवं घालता कामा नये आणि नमाजही पढता कामा नये अशी अपेक्षा ठेवणं गैर आहे का? प्रशासनाने फक्त न्याय करणं आणि परिस्थिती आटोक्यात ठेवणं अपेक्षित आहे. आणि ते जर होत नसेल, कोणत्याही कारणाने, तर तो दोष त्यांचा नाही तर कुणाचा? मुजफ्फरनगरमध्ये एवढं सगळं होऊनही मुलायमसिंग यादव तिकडे फिरकले नाहीत. दुसरीकडे जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या कार्यकर्त्यांनी मात्र १४ ते २० डिसेंबरदरम्यान मुजफ्फरनगरमध्ये फिरून परिस्थितीची माहिती घेतली, लोकांशी संवाद केला आणि २० डिसेंबर ते २३ डिसेंबर अशी चार दिवसांची 'दिल जोडो, नफरत छोडो यात्रा' आयोजित केली. संवेदना जागी असणारे लोक आपल्या परीने शांततेसाठी प्रयत्न करताना दिसतात आणि ज्यांच्या पाठीशी सगळ्या यंत्रणा, पोलीस तैनात आहे ते मात्र अशा वेळीही जागचे हलत नाहीत! दंगलीच्या वेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसबळाचा वापर केला जातो, पीडितांना नुकसानभरपाई दिली जाते हे ठीकच पण अशा भीतीच्या वातावरणात सलोखा निर्माण करण्यासाठी 'आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, घाबरू नका' हा मानसिक आधार देण्याची फार गरज असते. अल्पसंख्य समाजाला तर याची अतिशय गरज असते. सरकार-प्रशासन हे का करत नाही? की अशा 'आउट ऑफ फॅशन' गोष्टी जनआंदोलनांसाठी राखून ठेवल्या आहेत? (अशा वेळी गांधीबाबांची आणि नौखालीची आठवण येतेच आणि मग प्रशासन, सरकार, अगदी राजकीय विश्लेषक वगैरे मंडळीसुद्धा त्यावर भाबडेपणाचं लेबल लावून मोकळे होतात!)

२७ ऑगस्टच्या घटनेनंतर सेक्शन १४४ लागू केलं गेलं होतं. पण तरीही ३० ऑगस्ट रोजी एक जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीशी संबंधित जिल्हा आणि राज्य पातळीवरचे मुस्लिम नेते उपस्थित होते. त्यांच्याकडून प्रक्षोभक भाषणे केली गेली. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्यातून वास्तविक विस्तवही जात नाही, पण या व्यासपीठावर ते एकत्र आले. त्यापाठोपाठ भाजपचे आमदार सोम संगीत यांनी एक फेक व्हीडिओ अपलोड केला. (हे संगीत सोम ठाकूर जमातीचे नेते. मुजफ्फरनगरमधील सरधना येथील पूर्णतः धर्माआधारित निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर हाजी याकूब कुरेशी यांच्याविरुद्ध जिंकले होते. हे कुरेशी म्हणजे ज्यांनी डेन्मार्कच्या व्यंगचित्रकाराविरुद्ध त्याने महंमद पैगंबरांच आक्षेपार्ह चित्रण केलं म्हणून फतवा काढला होता आणि त्याचं शीर आणून देणाऱ्याला पन्नास लाखांचं इनाम जाहीर केलं होतं! व्हीडीओ प्रकरणात संगीत सोमवर गुन्हा दाखल झाला.) त्यात मुस्लिम जमावाकडून दोन हिंदू मुलांची कशी निर्घृण हत्या झाली याचं चित्रण आहे असा प्रचार केला गेला. या व्हीडीओमुळे धार्मिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला. ७ सप्टेंबर रोजी हजारो जाट शेतकऱ्यांची एक 'बहू बेटी बचाओ महापंचायत' बोलावली गेली. ही सभा भाजपच्या स्थानिक कार्यालयाच्या पुढाकाराने भरवली गेली होती. स्थानिक हिंदू नेत्यांची या सभेत प्रक्षोभक भाषणे झाली. या सभेनंतर हिंसेच्या घटना वाढल्या आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.

कलम १४४ लागू असताना राजकीय नेत्यांना सभा आयोजित करण्याची परवानगी कशी मिळाली आणि या नेत्यांना अटक का झाली नाही (त्यांची नावे नंतर दाखल केल्या गेलेल्या एफआयआरमध्ये होती) हे प्रश्न अनुत्तरित आहेत. यामधून काही काँस्पिरसी थिअरीजनी जन्म घेतला - हिंदू आणि मुस्लिम मते वाटून घेण्यासाठी समाजवादी पार्टी आणि भाजप यांच्यात छुपा करार झाला आहे, काँग्रेसचा उद्देश मुख्य मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष हटवणं हा आहे, भाजपला जाट मतदारसंघ काबीज करायचा आहे इ. याव्यतिरिक्त या दंग्यांचा सर्वात मोठा 'राजकीय खुलासा' असाही आहे की नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी उत्तर प्रदेश काबीज करण्याचे भाजपचे हे डावपेच आहेत. आजच्या भारतीय राजकारणावरील उजव्या शक्तींचा प्रभाव बघता येत्या दिवसात काय होऊ शकतं याची एक झलक मुजफ्फरनगरच्या निमित्ताने बघायला मिळाली आहे. संघ परिवार आणि भाजप यांच्याकडून जातीविशिष्ट (मुजफ्फरनगरच्या संदर्भात जाट लोकांशी संबंधित) चालीरीतींचा संबंध 'धार्मिकते'शी जोडण्याचा प्रयत्न होताना दिसतो. जात-संस्कृती आणि धर्म-राजकारण यातील सीमारेषा पुसण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जातो आणि त्यातूनच ७ सप्टेंबरच्या 'बहू-बेटी बचाओ पंचायतीचं रूपांतर हिंदू अस्मिता 'लव्ह जिहादीं'पासून वाचवायच्या संघर्षात झालं.  (संदर्भ : इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली, ५ ऑक्टोबर २०१३. Mujaffarnagar 2013 - Meanings of Violence, हिलाल अहमद यांचा लेख). लव्ह जिहाद म्हणजे मुस्लिम तरूण मुलांनी इतर धर्मीय मुलींना लक्ष्य बनवून, त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करून त्यांना इस्लाम स्वीकारायला लावणे. विश्व हिंदू परिषदेची प्रेस नोट म्हणते की जिहादी लोकांकडून गावोगावच्या हिंदू मुलींच्या शीलहरणाच्या घटना सहन करण्याच्या पलीकडे गेल्या तेव्हा समाज त्यांच्या विरोधात बहू बेटी बचाओ आंदोलनाच्या रूपाने उभा राहिला आहे. गावोगावी जर हिंदू मुली शीलभ्रष्ट होत असतील तर आजवर विश्व हिंदू परिषद आणि भाजप वगैरे मंडळी गप्प बसली हे एक नवलच! आणि ज्या हिंदू मुलींवर हिंदू पुरूषांकडून अत्याचार झाले आहेत त्या हिंदू पुरूषांबाबत आपलं काय म्हणणं आहे हेही विहिंपने एकदा सांगून टाकावं!

हिलाल अहमद यांच्या लेखात त्यांनी आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे ते म्हणजे मुजफ्फरनगरमधील मुस्लिम लोकांमधील जातीभेद. अश्रफ मुस्लिम हे उच्चजातीय आहेत आणि नॉन अश्रफ समूह हे निम्नजातीय समजले जातात. (मुजफ्फरनगरमध्ये एकूण लोकसंख्येच्या ३०% मुस्लिम आहेत). एका अनधिकृत अंदाजानुसार मुजफ्फरमधील दंगलीत जे मुस्लिम मारले गेले त्यातील बहुसंख्य मुस्लिम तथाकथित खालच्या जातीचे होते.

मुजफ्फरनगरची परिस्थिती मानवीय दृष्टीकोनातून पाहिलं तर ती कमालीची भीषण आहे हे उघडच आहे. पण त्याहून धडकी भरते ती भविष्याच्या कल्पनेनी. उत्तर प्रदेशचं भारतीय राजकारणातील महत्त्व सर्वश्रुत आहे. बहुमतासाठी आवश्यक २७२ जागांपैकी ८० म्हणजे सुमारे तीस टक्के जागा उत्तर प्रदेशच्या आहेत. अमित शहा सध्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे 'पोल मॅनेजर' आहेत त्यामुळे बऱ्याच गोष्टींकडे आपोआपच निर्देश होतो आहे. नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशमध्ये धडाक्यात प्रमोट केलं जात आहे. समाजवादी पार्टीबाबत संभ्रमच आहे. कारण हिंदू मतांकरता ते उघडपणे काही करणार नाहीत आणि दुसरीकडे मुस्लिमांसाठीही ते काही करत नाही आहेत. मुजफ्फरनगरमुळे त्यांच्यावर प्रशासकीय नामुष्की ओढवली आहे ती वेगळीच. त्यामुळे त्यांची बस जवळजवळ चुकलीच आहे. काँग्रेसचं पानिपत लोकसभा निवडणुकीत रोखता येणार नाही ही बऱ्याच जणांची अटकळ आहे (सोनिया गांधीचीसुद्धा असेल!). आणि तसंही उत्तर प्रदेशातून काँग्रेस उखडली गेल्यात जमा आहे. अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोक दल या जाट पक्षाचाही फारसा प्रभाव राहिलेला नाही. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दहा जागा मिळाल्या होत्या. २००१ मध्ये त्यांनी भाजपशी युती केली होती आणि नंतर ते बाजू बदलत राहिले आहेत. त्यामुळे गेली काही वर्षं जाट समुदाय भाजपकडे वळू लागला आहे. (मुजफ्फरनगरने तर त्यावर शिक्कामोर्तबच केलं आहे). वाल्मिकी समुदाय, जो दलित समुदाय आहे, भाजपने आपल्याकडे वळवायला सुरूवात केली आहे. शामलीध्ये सप्टेंबर ४, २०१३ रोजी झालेल्या वाल्मिकी-मुस्लिम चकमकीत काही वाल्मिकींना अटक झाली होती. त्यानंतर भाजपने तिथे बंद पुकारला आणि शामलीच्या पोलिस अधीक्षकांची बदली करण्याची मागणी केली. तो मुस्लिमच होता. काही महिन्यांपूर्वी एका वाल्मिकी मुलीवर बलात्कार झाला तेव्हा भाजप नेते हुकूम सिंग यांनी मोठी सभा बोलावली, धरणं दिलं आणि संबधित पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी केली. प्रकरण शेकेल म्हणून सप्टेंबर २० रोजी सरकारने त्या अधिकाऱ्याची बदली केली. रोहिलखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेश (जिथे वरूण गांधी भाजपचे प्रतिनिधी आहेत) मध्ये भाजप सक्रिय आहे. 'आप'ने दिल्लीत झेंडा रोवला असला तरी उत्तर प्रदेशबाबत आत्ता काही सांगता येणं कठीण आहे. या परिस्थितीत भाजपने आपले हातपाय पसरायला जी सुरूवात केली आहे त्यात ते यशस्वी झाले तर?

समकालीन हिंदुत्व स्वतःला कसं प्रकट करतं आहे आणि कोणकोणत्या मार्गाने प्रकट करतं आहे इकडे नीट पाहिलं पाहिजे. हिंदुत्वाचं वादळ पुरेसं ताकदवान झालं आहे. 'आप'सारख्या पक्षाने जनतेत नवचैतन्य आणलं असलं आणि ती अतिशय स्वागतार्ह, कौतुकास्पद गोष्ट असली तरी पूर्ण देशाचा विचार करताना भाजपचं अस्तित्व आणि वेग पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारांसाठी चिंताजनक आहे. म्हणूनच मुजफ्फरनगर देशाला कुठे घेऊन जाईल ही भीती वाटते आणि ही भीती वाटते याचं कारण धर्माधिष्ठीत राजकारण करणारे अजूनही लोकांना आपल्याकडे वळवू शकतात या वास्तवात आहे.

- मिळून साऱ्याजणी (फेब्रुवारी २०१४)

4 comments:

  1. 'ऐसी'वरच्या एका धाग्यावर 'कशाची भीती?' (http://aisiakshare.com/node/2535) असा प्रश्न मी विचारला होता, त्याचं उत्तर असल्यासारखा हा लेख आहे. (या लेखाचा दुवा तिथे डकवते आहे). लेख उत्तम आहे हे वेगळं सांगायला नकोच. पण महत्त्वाचं म्हणजे मराठी आंतरजालावर (फोरम्स + ब्लॉगर्स) या विषयावरचा हा मी वाचलेला पहिलाच विस्तृत लेख. त्याबद्दल आभार अधिक अभिनंदन.

    ReplyDelete
  2. धर्माधारित लढ्याच्या भगभगीत वास्तवाचं दर्शन घडवणारा लेख आवडला. सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठी पेटवलेल्या आगीत सामान्य निरपराध लोक होरपळून निघतात हे दुर्दैव.

    ReplyDelete